चिटणीस, म. भि. : (११ नोव्हेंबर १९०७ – १४ नोव्हेंबर १९८३). महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक सवर्ण सहकाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे सहकारी. त्यांचा जन्म एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा (तत्कालीन कुलाबा जिल्हा) येथे झाला. मुरुड येथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथून पूर्ण केले. १९२५ मध्ये त्यांनी विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी. ए. इंग्रजी ऑनर्स (१९३१), एम. ए. इंग्रजी (१९३३), एम. ए. मराठी (१९३५) आदी पदव्या त्यांनी मुंबई विद्यापीठातून घेतल्या. त्यांचा विवाह बडोदा येथील इंदूमती आंबेगावकर यांच्याशी झाला (१७ जून १९३७).

चिटणीस कायस्थ असूनही तत्कालीन जाती व्यवस्थेतील विषमता आणि अपमान त्यांनी स्वतः अनुभवला होता. त्यामुळे दलित समाजालाबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती होती. वामनराव दिघे या मित्राच्या मदतीने त्यांनी एका झोपडीत दलित मुलांसाठी शाळा सुरू केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते आंबेडकरांच्या सान्निध्यात आले आणि त्यांच्या कार्याशी एकरूप झाले. चिटणीस यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले. दरम्यान त्यांनी राजा शिवाजी हायस्कूल (पूर्वीचे किंग जॉर्ज हायस्कूल) या इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून काही काळ काम केले. आंबेडकर यांच्या शिफारशीवरून ते खालसा महाविद्यालयात मराठी विषयाचे अधिव्याख्याता झाले (१९३७). पुढे मरीन ड्राइव्ह येथील मिलिटरी बॅरॅक्समध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीने सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. तेथे चिटणीस यांची मराठी विभागप्रमुखपदी नियुक्ती झाली (२२ जून १९४६). पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद (सांप्रत छ. संभाजीनगर) येथील मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून चिटणीस यांची नियुक्ती झाली (२२ जून १९५०).

डॉ. आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली (१४ ऑक्टोबर १९५६), तेव्हा चिटणीस यांनीही बौद्ध धर्म अनुसरला. औरंगाबाद येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘बोधि’ हे नाव दिले. काठमांडू येथील बौद्ध धर्म परिषदेत ते आंबेडकर यांच्यासोबत उपस्थित राहिले (१४ नोव्हेंबर १९५६). औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे (आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे) पहिले कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले (१७ जून १९५७-३० जून १९६८). त्यानंतर मिलिंद महाविद्यालयात पुन्हा प्राचार्य म्हणून रुजू झाले. ‘मिलिंद’ या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित पाक्षिकाला त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. वयाच्या ६५ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले(१ जुलै १९७३). मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात चिटणीस अग्रभागी होते व त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला (डिसेंबर १९६९).

चिटणीस यांची ग्रंथसंपदाही विविधांगी आणि मूलभूत स्वरूपाची आहे. ‘युगयात्रा’ (१९५५) हे त्यांचे महत्त्वाचे नाटक. ‘स्मरण बाबांचे’ (लघु पुस्तिका, १९७५), ‘(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ) नामांतराविरुद्ध अत्याचारी आंदोलन काही प्रश्नोत्तरे’ (१९७८), ‘जिवंत झाल्या सावल्या’ (एकांकिका, १९७९) ‘महाराष्ट्रातील आज उद्याचा सांस्कृतिक संघर्ष आणि वाङ्मयीन समस्या’, ‘दलित साहित्य: जाणीव आणि प्रेरणा’, ‘दलित साहित्य आणि समीक्षा’, ‘विकासवाद आणि कला’, ‘परंपरा आणि दलित साहित्य’ ‘आत्मवंचना की बौद्धिक अप्रामाणिकता’, ‘ब्राह्मणी परंपरा आणि परिवर्तन’, ‘दलित जाती-जमाती’, ‘शिष्यवृत्ती आणि उच्चशिक्षण’, ‘अस्मिता आणि आदर्श’ आदी ग्रंथांतून त्यांनी सखोल चिंतन मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध अँड हिज धम्म’ या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेचे चिटणीस महत्त्वाचे साक्षीदार आहेत. पुढे या ग्रंथाचा मराठी अनुवाद चिटणीस, घनश्याम तळवटकर व शा. शं. रेगे यांनी केला. ‘बौद्ध धम्माचे महत्त्व’, ‘धर्मांतर: बौद्ध धर्मच का?’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म’, ‘धर्मांतराने दैववादाचा व भ्रामक कल्पनांचा नाश’, ‘धर्मदास्य लोकशाही विवेक आणि दलितमुक्ती’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी लेखांमधून चिटणीसांचे धम्मचिंतन दिसून येते.

चिटणीस हे महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती व  संपादक मंडळाचे सदस्य होते (१९७६-१९८२). महाराष्ट्र शासनाचा ‘दलित मित्र’ पुरस्कार (१९७२), ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ (२६ जानेवारी १९८२) आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मुंबई येथील महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९६६), तसेच अस्मितादर्श लेखक मेळाव्याचे ते दोन वेळा उद्घाटक होते (१९७४ व १९७७).

चिटणीस यांच्यावरील ‘गौरविका : मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव श्री. म. भि. चिटणीस यांच्या सेवानिवृत्ती प्रीत्यर्थ’ (३० जून १९६८ ), ‘प्राचार्य म. भि. चिटणीस एकसष्ठी सत्कार समारंभ स्मरणिका’ (९ फेब्रुवारी १९७०) हे गौरवग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच चिटणीस यांच्या समग्र वाङ्मयावर वामन निंबाळकर यांनी संपादित केलेला ‘सामाजिक क्रांतीची दिशा’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. चिटणीस यांनी मिलिंद महाविद्यालयात आंबेडकरी चळवळ आणि विचारांचा वेध घेऊन समाजात सुरू असलेल्या मूल्यसंघर्षाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी वैचारिक आणि वाङ्मयीन उपक्रमाला योग्य दिशा दिली. त्यातून हे महाविद्यालय १९६० ते १९८० या दोन दशकात सामाजिक आणि वाङ्मयीन चळवळीचे केंद्रबिंदू बनले.

चिटणीस यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मिलिंद महाविद्यालयातच आंबेडकरांच्या उपस्थितीत सादर झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षा समारंभानंतर त्याच रात्री सहा लाख लोकांच्या उपस्थितीत या नाटकाचा प्रयोग झाला. रामायण काळापासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत म्हणजेच शंबुकापासून आंबेडकरांपर्यंतच्या कालखंडात येथील समाजव्यवस्थेने, हिंदू परंपरेने दलितांचे सामाजिक, मानसिक व  सांस्कृतिक स्वरूपात कसे शोषण केले आहे, याचे चित्रण या नाटकात पाहावयास मिळते. हे नाटक गद्यात्मक व पद्यात्मक स्वरूपात सादर करण्याची एक वेगळीच तंत्रपद्धती चिटणीस यांनी वापरली. दलित रंगभूमीवरील नाटके कशी असावीत, याचा आदर्श या नाटकाने घालून दिला. अन्यायी परंपरांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी आंदोलनाची युगयात्रा आणि दलितांना माणूस म्हणून प्राप्त झालेले बळ ही या नाटकाची समर्थ पार्श्वभूमी आहे. मूलभूत चिकित्सा आणि चिंतनशीलता ही चिटणीस यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.

औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • चिटणीस, इंदूमती, ‘आमचे डॉक्टर’, प्रकाशक प्रदीप मनोहर बोधी, औरंगाबाद, १९९२.
  • निंबाळकर, वामन, ‘सामाजिक क्रांतीची दिशा’, प्रबोधन प्रकाशन, नागपूर, २००७.
  • बागुल, योगीराज, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०१५.

समीक्षक : लहू गायकवाड


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Are you human? Please solve:Captcha